Lockdown : लगीनघाई अंगलट ! लग्नाआधीच वरात पोलीस ठाण्यात

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यभरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला असून
टाळेबंदीमुळे अनेकांना विवाह सोहळे पुढे ढकलावे लागले आहे. अशातच पाथर्डी शहरात ही लगीनघाई एकाला अंगलट आली. लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वी आता नवरा-नवरीसह तब्बल 17 जणांना पोलिसांचा पाहुणचार घ्यावा लागणार असून त्यांची वरात पोलीस ठाण्यात पोहोचली आहे.

कोरोनामुळे ठिकठिकाणी लॉकडाउन करण्यात आले आहे. मात्र तरी देखील मुलामुलीचे लग्न धुमधडाक्यात साजरे करण्याच्या तयारीला लागलेल्या दोन कुटुंबाला एका कापड व्यापार्‍याने मदत केली. नियम झुगारून पाथर्डी शहरातील श्रीराम कलेक्शन या कापड दुकानदाराने लग्नाचा बस्ता बांधायला मदत केली. पण खबर मिळाल्यानंतर पोलीस दुकानात आल्यानंतर नवरानवरी व व्यापार्‍यांसह 17 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

लग्नाचा बस्ता आनंद मारुतराव फासे यांच्या आनंद कलेक्शन या दुकानात बांधला जात असल्याची माहिती प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांना समजली. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक वसंत पवार यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांना घेऊन या कापड दुकानावर छापा टाकला. दुकानात आनंद फासे व त्यांचे दोन कर्मचारी व लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी आलेले नवरा व नवरी मुलीच्या 15 नातेवाईक हे लग्नासाठी लागणार्‍या कपडयांची खरेदी करत असल्याचे आढळून आले. या सर्वाना मग ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

पोलिसांनी दुकानदार आनंद फासे, कामगार इंद्रजित टेमकर, संदीप लगारे हे तिघे जण आणि बस्त्यासाठी आलेले शंकर दहीफळे, शिवाजी दहीफळे, शेषराव पालवे, पोपट दहीफळे, जालिंदर दहीफळे, गणेश दहीफळे, राजेंद्र दहीफळे, पप्पु दहीफळे, मंगल दहीफळे सर्व राहणार ( रा. मोहटे, ता. पाथर्डी) दत्तात्रय घुले, गहिनीनाथ घुले, बाळू नाथा घुले, राजेंद्र घुले, स्वाती घुले (रा. शेकटे ता. पाथर्डी ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.