कामाची गोष्ट ! E-संजीवनी OPD चं मोबाईल अ‍ॅप लॉन्च, आता घरबसल्या करा मोफत चेकअप, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –    खासगी रुग्णालये कोरोनामुळे बंद पडलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी वैद्यकीय सल्ला व आरोग्य तपासणीसाठी ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवेचे मोबाइल ॲप सुरू करण्यात आले आहे. पूर्वी ही सेवा संगणक आधारित होती, म्हणून तिच्या वापरावर निर्बंध होते. आता अँड्रॉइड आधारित ॲप तयार करण्यात आले आहे, त्यामुळे स्मार्टफोन धारक त्याचा लाभ घेऊ शकतात. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येणार आहे. जवळपास 1600 रुग्णांनी आतापर्यंत या सेवेचा लाभ घेतलेला आहे.

राज्यात एप्रिल महिन्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली ही सेवा मे महिन्यापासून पूर्णपणे कार्यरत झाली आहे. दरम्यान रुग्णांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आवाहन केले आहे की www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला भेट देऊन त्यांनी तज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच ते जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणाले होते की, एका महिन्यात या सेवेचे मोबाइल ॲप सुरू केले जाईल. त्यानुसार, एका महिन्यात हे ॲप तयार करण्यात आले आहे.

संगणक, लॅपटॉपच्या साहाय्याने राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत कुठल्याही आजारावर वैद्यकीय सल्ला आणि उपचाराचा लाभ घेता येतो. आतापर्यंत राज्यभरातील 1606 लोकांनी या सेवेचा लाभ घेतला असून ही सेवा आतापर्यंत फक्त संगणक आधारित ॲप्लिकेशनपुरतीच मर्यादित होती. परंतु आता मोबाइल ॲप तयार करण्यात आल्यामुळे त्याचा वापर सर्वसामान्यांमध्ये जास्त प्रमाणात वाढणार आहे. त्यानुसार गरज भासल्यास डॉक्टरांची संख्या देखील वाढवता येईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागांच्या संयुक्त उपक्रमात सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 या वेळेत ऑनलाईन ओपीडी उपलब्ध असून रुग्णांकडून कोणतीही फी घेतली जात नाही. ही सेवा रविवारी उपलब्ध नसते.

अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=in.hied.esanjeevaniopd&hl=en_US

ई-संजीवनी ओपीडी ॲप असे आहे:

– नोंदणी करणे- मोबाइल नंबरवर नोंदणीनंतर ‘ओटीपी’ येतो. त्याद्वारे रुग्ण नोंदणी फॉर्म भरू शकतो. नंतर टोकनच्या विनंतीनंतर आजाराशी संबंधित काही कागदपत्रे, अहवाल अपलोड केले जातात. त्यानंतर रुग्णाला एसएमएसद्वारे ओळख क्रमांक आणि टोकन नंबर प्राप्त होतो.

– लॉगिनसाठी सूचना एसएमएसद्वारे येते. त्यानंतर रुग्ण दिलेल्या ओळखक्रमांकाच्या आधारे लॉगिन करू शकतो.

– डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर लगेच ई-प्रिस्क्रिप्शन प्राप्त होते.