Maharashtra News : भाजपाच्या माजी आमदाराला कैदेची शिक्षा

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीच्या लेखापालाला मारहाण करुन शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल पांढरकवडा येथील भाजपाचे माजी आमदार राजू तोडसाम यांना सत्र न्यायालयाने ३ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पोलिसांनी राजू तोडसाम यांना ताब्यात घेऊन त्यांची यवतमाळ जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे.

राजकीय नेते अनेकदा शासकीय कर्मचार्‍यांना मारहाण करतात. त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात. पण पुरेशा पुराव्या अभावी तसेच अनेकदा फिर्यादीवर नंतर दवाब आणला जातो. त्यामुळे अनेक प्रकरणात शिक्षा होत नाही. १७ डिसेंबर २०१३ रोजी घडलेल्या या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिलेली शिक्षा सत्र न्यायालयाने कायम केली आहे.

मरकाम नावाच्या व्यक्तीला वीजेचे जादा बिल आले म्हणून राजू तोडसाम यांनी १७ डिसेंबर २०१३ रोजी पांढरकवडा येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात लेखापाल विलास आकोट यांना शिवीगाळ करुन मारहाण केली होती. आकोट यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील रमेश मोरे यांनी दहा साक्षीदार तपासले होते. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी २७ नोव्हेंबर २०१५ रोजी राजू तोडसाम यांना दोषी ठरवून २९४ कलमान्वये तीन महिने साधा कारावास व १० हजार रुपये दंड तसेच ३५२ कलमान्वये तीन महिने कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्याला तोडसाम यांनी सत्र न्यायालयात आव्हान देऊन स्थगिती मिळविली होती. आता सत्र न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निकाल कायम केला आहे.