दुर्दैवी ! खाद्य नसल्यामुळे पोल्ट्रीतील भुकेल्या कोंबड्या एकमेकांच्या जीवावर !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे पोल्ट्री व्यवसायाला घरघर लागली असून कवडीमोल भावाने पक्षांची विक्रि करावी लागत आहे. परवडत नसल्यामुळे सांगलीसह राज्यातील विविध भागात पोल्ट्री व्यवसायिकांनी कोबड्यांचा खुराक बंद केला आहे. अपुरे पशुखाद्य आणि त्यातही ‘क’ जीवनसत्त्वाचा अभाव यामुळे बेजार झालेल्या कुकुटपालन केंद्रावरील कोंबड्यांनी एकमेकांवर ताव मारण्याचे प्रकार दिसून आले आहेत.

बॉयलर कोंबडीची मागणी गेल्या काही दिवसात जवळपास ठप्प झाली आहे. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पोल्ट्री व्यावसायिकांनी असलेल्या कोंबड्यांना पशूखाद्य, जीवनसत्त्वाचा पुरवठा करणे अवघड बनले आहे. बाजारपेठेतील मांसाची मागणी पूर्ण करण्यासाठी विविध कंपन्याकडून बॉयलर कोंबड्यांची खरेदी केली जाते. गेल्या दोन महिन्यापासून कोरोना होण्यास चिकन कारणीभूत असल्याची अफवा पसरल्याने खरेदी करण्यास ग्राहकच येत नाही. यामुळे पोल्ट्रीतील बॉयलर कोंबडी उत्पादनाचे काय करायचे? असा प्रश्न व्यवसायिकांसमोर निर्माण झाला आहे.

काहींनी मोफत कोंबडी वाटून यावर खाद्य खर्चातून सुटका करून घेतली असली तरी काही व्यावसायिकांनी बॉयलर कोंबडया अद्याप सांभाळल्या आहेत. मात्र त्यांची खाद्याची व व्हिटॅमिनची गरज टाळेबंदीमुळे पूर्ण करणे अशक्य झाले आहे. यातच मका आवक थंडावली असून बाजारात उपलब्ध नाही. खाद्यातून व्हिटॅमिनचा योग्य पुरवठा होत नसल्याने शेडमध्ये असलेल्या कोंबड्या एकमेकांना चोचीने मारून घायाळ करीत आहेत.

एकमेकांना चोच मारुन प्रसंगी आपली गरज भागवत असल्याचे चित्र काही पोल्ट्रीमध्ये दिसून येत असल्याचे पोल्ट्री व्यावसायिक शत्रुघ्न जाधव यांनी सांगितले. तर मक्याची साठेबाजी होत असून काही व्यापार्‍यांनी आपल्या गोदामामध्ये मक्याची साठवणूक केली असल्याची तक्रारही खानापूर तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटनेने जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असल्याचे जाधव यांनी सांगितले.