Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात 77 पोलीस ‘कोरोना’ पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. सामान्य नागरिकांबरोबरच पोलीस विभागातही कोरोनाचे दररोज पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. मागील 24 तासात राज्यात आणखी 77 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले असून एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. पोलीस दलात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे.

राज्यात गेल्या 24 तासात 77 पोलीस कोरोना पॉझिटिव्हि आढळून आले असून राज्यातील कोरोना बाधित पोलिसांची संख्या 4938 इतकी झाली आहे. तर 60 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांपैकी 3813 पोलिसांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुक्त झालेल्या पोलिसांपैकी काही जण कामावर हजर झाले आहेत. राज्यात मागील 24 तासात एका पोलिसाचा मृत्यू झाला असून आतापर्यंत राज्यात 60 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूविरोधात देशात सुरु असलेल्या लढाईत कोरोना योद्ध्यांची भूमिक बजावणाऱ्या पोलिसांना दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी घरात सुरक्षित रहावे यासाठी, आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना महामारीच्या संकटात पोलीस रस्त्यावर चोवीस तास कर्तव्य बजावत आहेत, असे असताना राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाचा आता त्यांना देखील अधिकच फटका बसत असल्याचे दिसत आहे. सध्या करोनाचा उपचार सुरू असलेल्या पोलिसांची एकूण संख्या १ हजार १५ वर पोहचली आहे.