धक्कादायक ! दफन केलेले मृतदेह भटक्या कुत्र्यांनी आणले रस्त्यावर, महाराष्ट्रातील घटना

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना काळात मृतांचा आकडा वाढल्याने कमी जागेत दफनविधी केला जात आहे. मात्र स्मशानभूमीत दफन केलेले मृतदेह भटके कुत्रे उकरुन काढून रस्त्यावर आणत असल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाण्यातील मलकापूरमध्ये समोर आला आहे. काही मृतदेहांचे सांगाडे स्मशानभूमी परिसरात रस्त्यावर पडलेले आढळून आले आहेत. दरम्यान मृतदेहाची अवहेलना होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी होत आहे.

मलकापूर शहरातील महाकाली वॉर्ड परिसरात नदीकाठावर वैकुंठधाम स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीची नदी पात्राकडील संरक्षण भिंतीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नदी पात्राकडून ही स्मशानभूमी उघडीच आहे. या स्मशानभूमीमध्ये सर्वधर्मिय मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. तर काही दफनही केले जातात. कोरोना काळात मृतांचा आकडा वाढल्याने स्मशानभूमीत जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे कमी जागेत दफनविधी केले जात आहेत. मात्र या ठिकाणी आता दफन केलेल्या मृतदेहांची अवहेलना होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील मोकाट कुत्रे स्मशानभूमीत जाऊन त्याठिकाणी पुरलेले मृतदेह उकरुन काढत आहेत. तसेच हे मृतदेह फरफटत नेण्याचाही प्रकार घडत आहे. तसेच काही प्रेतांचे लचके तोडण्याचीही बाब समोर आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.