पालघर हत्याकांड प्रकरणी पोलीस अधीक्षक गौरव सिंह सक्तीच्या रजेवर

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर असल्याच्या संशयातून दोन साधू आणि त्यांच्या चालकाची जमावाने हत्या केली होती. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेचा संपूर्ण देशभरातून निषेध करण्यात आला होता. त्यानंतर गुरुवारी (दि.7) राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अचानक घटनास्थळाला भेट दिली आणि या प्रकरणाचा आढावा घेतला. या दौऱ्यानंतर गुरुवारी संध्याकाळी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई केली असल्याचे सांगितले.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गडचिंचले येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार, गावातील सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून त्या दिवशीचा संपूर्ण घटनाक्रम त्यांनी जाणून घेतला. यावेळी त्यांच्यासोबत खासदार राजेंद्र गावित, आमदार सुनील भुसारा, आमदार श्रीनिवास वनगा, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण साळुंखे आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

पालघरमध्ये नमकं काय घडलं ?
डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर असल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने तिघांची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. यावेळी समजूत घालण्यासाठी आलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. या प्रकरणी कासा पोलिसांनी 110 जणांना अटक केली आहे. हा हल्ला गावात चोर आल्याच्या अफवेमुळे झाला. या हल्ल्यात सुशीलगिरी महाराज (वय-30) चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (वय-70 रा. कांदिवली आश्रम) व चालक नीलेश तेलगडे (वय-30) या तिघांचा जागीच मृत्यू झाला.