महाराष्ट्र पोलिसांना कडक सॅल्युट ! तुम्ही थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन करत होता, तेव्हा ‘ते’ बजावत होते कर्तव्य

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – 2020 च्या कटू आठवणीला गुडबाय म्हणत, लॉकडाऊनच्या सरत्या वर्षाला निरोप देत तरुणांईने नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. प्रत्येकजण आपल्या कुटुंबाबरोबर किंवा मित्रांबरोबर नववर्ष साजरा करण्यात मग्न होते. तर दुसरीकडे मात्र अशावेळी पोलिस कोरोनाच्या काळात नववर्षाचे स्वागतासाठी रस्त्यावर अधिक गर्दी होऊ नये याकरिता थर्टी फर्स्टला रात्रीपासून तर, नवीन वर्षाची पहाट उजाडेपर्यंत शहरात रस्त्यावरच डोळ्यात तेल घालून खडा पहारा देतांना दिसून आले.

शहरातील बहुतांश रस्ते पोलिसांच्या दमदार उपस्थितीमुळे रात्री दहापासूनच निर्मनुष्य दिसत होते. रात्री दहापर्यंत बार, हॉटेल्स उघडे ठेवू नये असे प्रशासनाचे आदेश असताना सुद्धा शहरात काही ठिकाणी बार, हॉटेल्समध्ये नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्ट्यांचेही आयोजन करण्यात आले होते. दहाही ठाण्याच्या हद्दीत मुख्य चौकात बॅरिकेटींग करून दुचाकी, कारचालकांची तपासणी करताना पोलीस दिसत होते. आवाहनानंतरही काही उत्साही लोक रस्त्यावर फिरतांना दिसले. त्यांची पोलिसांनी तपासणी केली. त्यात काही जण मद्यप्राशन करून वाहन चालविताना दिसले. त्यांची जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाली. पोलिसांची मोठ्या संख्येने रस्त्यावर उपस्थितीमुळे अनेकांनांची फजीती झाली.

अनेकांवर दंडात्मक कारवाई करताना पोलिस दिसून आले. इर्वीनचौक ते राजापेठ आणि शिवाजीनगर ते पंचवटीचौक या मार्गाचे दोन्ही उड्डाणपूल रात्री साडेनऊ पासूनच वाहतुकीसाठी बंद केले होते. अमरावती ते नागपूर महामार्ग, बडनेरा मार्ग, गाडगेनगर परिसर, नांदगावपेठ हद्दीत काही बार, हॉटेलमध्ये उशिरापर्यंत ग्राहकांची रेलचेल सुरूच होते. पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी स्वत: काही आस्थापना ज्या नियमबाह्यपणे उघड्या दिसल्या, त्यांच्या मालक, संचालकांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश दिले.