महाराष्ट्र पोलिस दलाचा अभिमान, पण सत्तेचा गैरवापर करून अनेकांना ‘एल्गार’मध्ये अडकवलं : शरद पवार

बैठकीतील ‘माहिती’ बाहेर गेली कशी ?

– शरद पवार यांचा बैठकीतील पोलिस अधिकाऱ्यांवर संशय
– पुणे पोलिसांच्या सत्तेच्या गैरवापराच्या चौकशीवर पवार ठाम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र पोलीस दलाचा आपल्याला अभिमान आहे. पण सत्तेचा गैरवापर करुन एल्गारमध्ये अनेकांना अडविण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या सत्तेच्या गैरवापराची चौकशी होणे आवश्यक आहे. सकाळी ११ वाजता झालेल्या बैठकीची माहिती बाहेर कशी आली, असा प्रश्न उपस्थित करुन शरद पवार यांनी वरिष्ठ पोलीस अधिका-यांवरही संशय व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध डावलून एल्गारचा तपास एनआयएकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची बैठक शरद पवार यांनी घेतली होती.

त्यानंतर आज शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत या मागणीचा पुनर्उच्चार केला आहे. पवार यांनी सांगितले की, गृहमंत्र्यांनी सकाळी ११ वाजता या प्रकरणी एसआयटी नेमण्याबाबत बैठक घेतली होती. त्यानंतर केंद्राने तातडीने दुपारी ४ वाजता निर्णय घेऊन एल्गारचा तपास एनआयएकडे सोपविला. बैठकीची माहिती बाहेर कशी गेली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र पोलीस दलाचा अभिमान असल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, एनआयएच्या कायद्यातील कलम १० नुसार राज्य शासन स्वतंत्र चौकशी करु शकते. एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. एल्गार परिषदेच्या तपासात सत्तेच्या अधिकाराचा गैरवापर झाला आहे. अनेकांना तुरुंगात जावे लागले आहे. सत्तेचा व अधिकाराचा गैरवापर झाला असल्याचे स्पष्ट होण्यासाठी स्वतंत्रपणे चौकशी होण्याची गरज आहे. स्वतंत्र तपासातून सत्य बाहेर येईल. तुरुंगात गेलेल्यांबाबत न्याय होईल, असे त्यांनी सांगितले.

You might also like