… म्हणून महाराष्ट्र पोलिसांना सतर्क राहण्याचे केंद्र सरकारकडून आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा अहवाल मागवण्यात आला असून महाराष्ट्र पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असल्याची सुत्रांची माहिती आहे. राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अहवाल केंद्राने मागवला आहे.

राज्यात कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत महाराष्ट्रातल्या राजकारणाबाबत आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याबात चर्चा झाली. बैठकीमध्ये राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थितीची माहिती मागवण्यात आली आहे. तसेच अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची सुत्रांची माहिती आहे.

राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीची शिफारस
राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम असल्याने आता राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. त्याबद्दलचा अहवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवला आहे. राज्यातील सद्यस्थिती पाहता राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी शिफारस राज्यपालांनी केली आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like