सांगलीतील सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) संभाजी गुरव यांची Everest शिखराला गवसणी

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी गुरव यांनी जगातील सर्वोच्च पर्वतरांग उंची 8848 मिटर असलेल्या एव्हरेस्ट शिखराला गवसणी घातली आहे. Everest शिखर सर करणारे वाळवा तालुक्यातील हे पहिले पोलीस अधिकारी ठरले आहेत. गुरव हे पडवळवाडी (ता. वाळवा) येथील रहिवाशी आहेत. त्यांच्या या यशावर वाळवा तालुक्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. गुरव सध्या पनवेल, मुंबई येथे कार्यरत आहेत. धाडसी व्यक्तिमत्व म्हणून पोलीस खात्यामध्ये त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्यापूर्वी महाराष्ट्र पोलिस दलातील सुहेल शर्मा आणि रफीक शेख यांनीही एव्हरेस्ट सर करण्याची कामगिरी केली आहे.

सर्वात आधी 2019 मध्ये संभाजी गुरव यांनी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी ऑक्सिजन सिलेंडर आणि इतर सर्व साहित्य बरोबर असूनही तब्येतीने साथ न दिल्याने त्यांना एव्हरेस्ट मोहीम अर्ध्यावर सोडून द्यावी लागली होती. पण त्यांनी एव्हरेस्ट सर करायचा निर्धार केला होता. त्यामुळे त्यांनी त्यांचे प्रयत्न सातत्याने सुरु ठेवले होते. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी प्रयत्न केला पण त्यातही अपयश आले होते. त्यानंतर गेल्या महिन्यात पुन्हा गुरव एव्हरेस्ट सर करण्याच्या उद्देशाने निघाले. यावेळी एव्हरेस्टचे शिखर गाठायच असा निर्धार त्यांनी केला. गेल्या महिन्यात म्हणजे 6 एप्रिलला ते मुंबईहून निघाले. त्यानंतर संपूर्ण मोहीम यशस्वीपणे पूर्ण करत त्यांनी अखेर 23 एप्रिल 2021 रोजी एव्हरेस्टवर भारताचा तिरंगा पुन्हा एकदा फडकावला. तिसऱ्या प्रयत्नात त्यांचे एव्हरेस्ट सर करण्याचं स्वप्न पूर्ण झाले आहे.