भाजपकडून कोल्हापूर जिल्ह्यात बेरजेचे ‘राजकारण’, फडणवीस व चंद्रकांत पाटील कोरे-आवाडे यांच्या भेटीला

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपाचे दोन दिग्गज नेते कोल्हापूर जिल्ह्यातील कोरे- आवाडे या दोन प्रमुख नेत्यांच्या भेटीसाठी रविवारी (दि.27) संध्याकाळी कोल्हापुरात येत आहेत. या भेटी खाजगी स्वरूपाच्या असल्या, तरी बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर त्याचे राजकीय संदर्भ काय असणार याची जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

केंद्र शासनाने कृषी कायदे केले असून, त्याविरोधात देशभर शेतकरी आंदोलन करीत आहेत. या कायद्याचे समर्थनार्थ भाजपा किसान सभा व रयत क्रांती संघटनेच्यावतीने आत्मनिर्भर यात्रा सुरू करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी फडणवीस हे इस्लामपूर येथे रविवारी सायंकाळी येत आहेत. तेथील सभा संपल्यानंतर ते कोल्हापूर जिल्ह्यात येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरे- आवाडे या दोन प्रमुख नेत्यांची फडणवीस व पाटील रात्री भेट घेणार असल्याने त्याकडे लक्ष वेधले आहे.

सर्वप्रथम फडणवीस हे माजी मंत्री आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्या भेटीसाठी वारणानगर येथे जाणार आहेत. आ. कोरे यांच्या आई सावित्रीबाई कोरे यांचे अलिकडेच निधन झाले होते. फडणवीस सात्वंनपर भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यानंतर ते तेथून इचलकरंजी येथे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना भेटणार आहेत. त्यांच्या पत्नी इंदुमती आवाडे यांचे अलिकडे निधन झाले होते. त्यांचे सांत्वन करण्यासाठी फडणवीस भेटणार आहेत. तसेच यावेळी ते कल्लाप्पा आवाडे यांना व भाजपाला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचीही भेट घेणार आहेत.