नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Politics News | बंड शमविण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी ‘समजूत मोहीम’ हाती घेतली असली, तरी जिल्ह्यात अद्याप उमेदवारी मागे घेण्याचा शब्द कोणत्याही बंडखोर उमेदवाराने दिलेला नाही. अनेक बंडखोर उमेदवारांकडे राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांनी समझोता करण्यासाठी काही दूत पाठविले होते, पण हे प्रयत्न देखील अपुरे पडत असल्याचे चित्र आहे. आज (दि.४) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे राजकीय हालचाली वाढल्या आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)
दरम्यान, महायुतीत (Mahayuti) काही मतदारसंघांमध्ये गोंधळ सुरू असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार (Ajit Pawar NCP) असलेल्या काही मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे (Shivsena Shinde Group) एबी फॉर्म दिले आहेत. अशातच नाशिकमधील देवळाली (Deolali Assembly Constituency) आणि दिंडोरी (Dindori Assembly Constituency) या मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी एबी फॉर्म दिलेले दोन्ही उमेदवार कालपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.
दिंडोरी येथील शिवसेना शिंदे गटाकडून एबी फॉर्म मिळालेले धनराज महाले (Dhanraj Mahale) आणि देवळालीतील राजश्री अहिरराव (Rajshree Ahirrao) या कालपासून नॉट रिचेबल आहेत. दिंडोरीत राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) तर देवळालीतून सरोज अहिरे (Saroj Ahire) यांना तिकीट देण्यात आले आहे.
मात्र असं असतानाही एकनाथ शिंदे यांनी ऐनवेळी दिंडोरीतून धनराज महाले आणि देवळालीतून राजश्री अहिरराव यांना एबी फॉर्म दिले होते. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी म्हणजे आज हा तिढा सुटून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार माघार घेतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता हे उमेदवारच नॉट रिचेबल झाल्याने महायुतीचे टेन्शन वाढलं आहे.