शिवसैनिकांना सल्ला देताना संजय राऊतांचा विरोधकांवर हल्ला, म्हणाले – ‘विरोधक ब्लॅक फंगस’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   कोरोना काळात मुंबईतील चांगल्या कामाची दखल WHO, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकजणांनी घेतली. या कामाचे विशेष कौतुक केले आहे, मात्र एवढे चांगल काम करूनही राज्यातील विरोधक टीका करतात. त्याकडे शिवसैनिकांनी दुर्लक्ष करून कामावर लक्ष द्यावे, कारण विरोधक ब्लॅक फंगस अर्थात म्युकरमायकोसिस आहेत, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाच्या नेत्यांवर निशाणा साधला. सकारात्मक राहून काम करा, असा सल्लाही त्यांनी यावेळी शिवसैनिकांना दिला आहे.

कोरोनाचा संसर्ग झालेल्या बालकांसाठी पुण्यात येरवडा येथे सुरु केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोविड सेंटरचे उद्धघाटन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते ऑनलाईनच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी राऊत म्हणाले की, कोरोनाच्या महामारीत प्रत्येक ठिकाणी सरकार पोहचेल याची खात्री देता येत नाही. तर दुसऱ्या लाटेत सामाजिक संस्था असो, की सर्वसामान्य व्यक्ती झोकून देऊन काम करीत आहेत. शहर आणि ग्रामीण भागात रुग्णालय उभारून रुग्णांना सेवा देणे ही मोठी राष्ट्रसेवा असल्याचे ते म्हणाले. या कोविड सेंटरमध्ये 40 खाटा बालक आणि त्यांच्या पालकांसाठी आहेत यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, शिवसेनचे गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक ॲड. अविनाश साळवे उपस्थित होते.