बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण कळणार ; बोर्डाचे महाविद्यालयांना लेखी आदेश

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बारावीचा निकाल लागून पाच दिवस झाले आहेत. परंतु, विद्यार्थ्यांना महाविदयालयाकडून गुणच मिळाले नाहीत. अशी शंका विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केली होती. त्यामुळे गेले चार दिवस बोर्डाच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरु होते. अखेर आज परीक्षा मंडळाने प्रात्यक्षिक परीक्षेत मिळालेल्या गुणांची झेरॉक्स कॉपी देण्याचे लेखी आदेश दिले आहेत.

दरम्यान बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पेपर चेकिंग आणि प्रात्यक्षिक परीक्षेतील गुणांमध्ये घोळ झाल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केला होता. निकालानंतर विज्ञान शाखेच्या काही विद्यार्थ्यांना खूप कमी गुण मिळाल्याने तर काहींना निकाल मिळल्यानंतर चक्क नापास केल्याने विद्यार्थी आक्रमक झाले होते.

गेले चार दिवस वाशीतील परीक्षा मंडळाच्या कार्यालयावर बारावीच्या नापास विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. आज सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देत परीक्षा मंडळ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्वरीत प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे.

आंदोलनाची तीव्रता पाहता बोर्डाने बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गुणांची झेरॉक्स कॉपी संबंधित विद्यार्थ्याला देण्याचे लेखी आदेश दिले आहेत. तसेच येत्या 15 जूनपर्यंत रिचेकिंगसाठी करण्यात आलेल्या 6500 अर्जांना उत्तरे देण्यात येणार आहेत. हे पेपर तपासण्यासाठी शिक्षकांना सुट्टीच्या काळात परत येण्याची विनंती बोर्डाकडून करण्यात येणार आहे.

You might also like