COVID-19 Vaccine Dry Run : पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयात आणि पिंपरीमध्ये पार पडली कोरोनाची ‘ड्राय रन’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आज पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयात कोविडची ‘ड्राय रन’ पार पडली. दरम्यान मान आणि चिंचवडच्या रुग्णालयातही ड्राय रन पार पडली आहे. ही ड्राय रन या तिन्ही रुग्णालयातील 75 नोंदणीकृत आरोग्य कर्मचाऱ्यांवर करण्यात आली आहे. मात्र अद्याप कोविडची लस कोणत्याही व्यक्तीला देण्यात आलेली नाही.

प्रशासनाने सिरम इन्स्टिट्युटच्या कोविड लसीला हिरवा कंदील दाखविल्यानंतर राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये कोविड ड्राय रन घेण्यात आली. यामध्ये पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालय, पिंपरी-चिंचवड शहरातील जिजामाता रुग्णालय आणि मान येथील ग्रामीण रुग्णालयात आज ही ड्राय रन सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान पार पडली.

दरम्यान जिल्हा प्रशासनाने याआधीच कोरोना लसीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या वेबसाईटवर त्या आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी केली होती ज्या कर्मचाऱ्यांवर ड्राय रन घेतली गेली. त्यांची मुलाखत घेऊन त्यांना लसीकरणाच्या ठिकाणी बसवून विचारपूस करण्यात आली की यामध्ये कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते.

विशेष म्हणजे संबंधित व्यक्तीला लस दिल्यानंतर जवळपास अर्धा तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जाते. आज केवळ ड्राय रन म्हणून ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. तथापि कुणालाही अद्याप लस देण्यात आलेली नाही. दरम्यान या तिन्ही केंद्रांवर आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.