ठाकरे सरकारसाठी दिल्लीतून आनंदाची बातमी, स्टार्टअप क्रमवारीत ‘सरशी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील स्टार्टअप राज्यांच्या क्रमवारीत महाराष्ट्राने ‘नेतृत्व’ श्रेणीत दुसरा क्रमांक मिळवला आहे. त्यासोबतच स्टार्टअप सुधारणांमध्ये राज्याने नवीन उद्योजक तयार करणे, नाविन्यपूर्ण विस्तार करणे तसेच जनजागृती आणि प्रसार या तीन वेगवगेळ्या निकषांवरच्या निकालात उत्तम गुण अर्जित करुन बाजी मारली आहे.

नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आयोजित केलेल्या केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांच्या स्टार्टअप संस्थासाठीच्या सहाय्य कामगिरीचा क्रमवारीवर आधारित निकालाची घोषणा आणि सत्कार समारंभ शुक्रवारी पार पडला. तेव्हा केंद्रीय वाणिज्य व उद्योग पियुष गोयल, राज्यमंत्री ओम प्रकाश आणि सचिव गुरु प्रसाद मोहपात्रा उपस्थित होते. तर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे वरिष्ठ अधिकारी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

तथापि, जाहीर करण्यात आलेल्या निकालात एकूण पाच श्रेणींमध्ये २२ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांना राज्यांच्या स्टार्टअप संस्थांसाठी ठरवण्यात आलेल्या विविध निकषांच्या आधारावर क्रमवारी देण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्राने स्टार्टअप योजनेच्या नियोजनबद्ध आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘नेतृत्व’ श्रेणीत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि महाराष्ट्र राज्य नाविन्य सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यावेळी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून उपस्थित होते, त्यांनी हा सन्मान स्वीकारला. राज्याने स्टार्टअपसाठी कार्यक्रमाची आखणी आणि उद्दिष्ट्य ठरवून उत्तम यंत्रणा निर्माण करत केलेल्या प्रभावी कार्यासाठी हा बहुमान मिळाला आहे.

राज्यातील नाविन्यपूर्ण दृष्टीकोन व प्रयत्नांना प्रोत्साहन देणे आणि नाविन्यपूर्ण उद्योगांसाठी पूरक वातावरण तयार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्य सोसायटीची स्थापना करण्यात आली. त्याबाबतची दखल सुद्धा या निकालात घेण्यात आली. मागील चार वर्षात राज्यात स्टार्टअपच्या माध्यमातून ५०० कोटींचा निधी उभारण्यात आला. स्टार्टअपसाठी पूरक असे वातावरण निर्मिती करुन सिंगल पॉईंट काँटॅक्ट उभे करण्यात आले.