…हे जर खरे असेल, तर कुठे नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र – गोपीचंद पडळकर

सांगली / विटा : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात टाळेबंदीबाबत बोलताना लॉकडाऊन करणार असल्याचा इशारा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री जनेतला संबोधित करताना दिला. यावरून विरोधकांनी विरोध केला. तसेच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोरोना महामारीच्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्र भारतातच नव्हे तर जगात चार नंबरला आला आहे. हे जर खरे असेल, तर कुठे नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र, अशी जोरदार टीका पडळकर यांनी केली आहे.

यावरून बोलताना पडळकर म्हणाले, मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी मीडियासमोर सामान्य लोकांना लॉकडाऊनची भीती घालणे बंद करावे. लॉकडाऊनशिवाय सुद्धा कोरोना नियंत्रणात आणता येतो. मागील एका वर्षात कोरोना संक्रमणाबाबतीत नेमके काय केले ?. वर्षभरानंतर सुद्धा तुम्हाला कोरोनाचा प्रसार रोखता आला नाही. हे महाराष्ट्रातल्या लोकांनी ओळखले आहे. हे तुम्ही पहिल्यांदा स्वीकारा असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणले, राज्य शासनाने चालवलेल्या लॉकडाऊनचा खेळ बंद करा. दरवेळी जनतेला गृहीत धरून शासनाने मनमानी निर्णय त्याच्यावर लादायचे हे कुठेतरी थांबले पाहिजे. याशिवाय प्रत्येक गोष्टीला जनतेला जबाबदार धरून रस्त्यावर उतरायला भाग पाडण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी स्वतः रस्त्यावर उतरावे. उगाच सारखे फेसबुक लाईव्ह करणे चुकीचे आहे, असेही पडळकर यांनी म्हटले आहे.