Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चा हाहाकार सुरूच ! 24 तासात 5368 नवे पॉझिटिव्ह तर 204 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. राज्यात आज 5368 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 204 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 3522 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या 5 ते 7 हजारांच्या दरम्यान आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात 5368 एवढे रुग्ण आढळून आल्याने राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 11 हजार 987 इतकी झाली आहे. तर राज्यात 87 हजार 681 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. आज 3522 रुग्ण बरे झाले असून राज्यात आतापर्यंत 87 हजार 681 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.37 टक्के एवढे असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत आज 1200 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 85 हजार 724 एवढी झाली आहे. तर 39 जणांचा गेल्या 24 तासांत मृत्यू झाला आहे. आज ठाणे महापालिका क्षेत्रात 268 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या 10999 इतकी झाली आहे.