Coronavirus : राज्यात रेकॉर्ड ब्रेक ! दिवसभरात 139 जणांचा मृत्यू तर 2436 नवे पॉझिटिव्ह, ‘कोरोना’बाधितांचा आकडा 80229 वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांबरोबरच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा देखील वाढत आहेत. गेल्या 24 तासात राज्यात 139 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंतच्या आकडेवारीत आजचा आकडा हा सर्वाधिक आहे. राज्यात मागील 24 तासात 2436 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 80 हजाराच्या वर गेला आहे. तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 2436 नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मागील चोवीस तासामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 139 झाली आहे. राज्यातील मृतांचा आकडा 2849 झाला आहे. तर आज राज्यात 1475 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची आतापर्य़ंतची संख्या 80 हजार 229 इतकी झाली आहे.

राज्यात सध्याच्या घडीला 42 हजार 215 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 43.81 टक्के आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा 3.55 टक्के झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात आज सर्वाधिक ठाणे परिमंडळात एकूण 93 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहेत. यामध्ये मुंबई 54, ठाणे 30, वसई-विरार आणि भिवंडीतील प्रत्येकी एका आणि कल्याण डोंबिवलीतील 7 रुग्णांचा समावेश आहे. तर नाशिक परिमंडळात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जळगावातील 14, मालेगाव 8 आणि नाशिकमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे परिमंडळात 16 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असून यामध्ये पुण्यात 14 आणि सोलापूरमधील दोघांचा समावेश आहे. रत्नागिरीत 5 आणि औरंगाबादमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.