Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चा धोका कायम ! 24 तासात 6603 नवे पॉझिटिव्ह तर 198 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, देशभरासह राज्यात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात 6 हजार 603 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 198 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 23 हजार 724 वर पोहचली आहे. जगभरातील देशांच्या बाबतीत महाराष्ट्रातील रुग्ण संख्या पाकिस्तानच्या खालोखाल आहे. पाकिस्तानचा जगभरात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत 12 वा क्रमांक लागतो.

राज्यातील एकूण 2 लाख 23 हजार 724 कोरोना बाधित रुग्णांमध्ये आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्या 1 लाख 23 हजार 192 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात 4634 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात 9 हजार 448 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 91 हजार 065 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मुंबईतील मृत्यूची संख्या वाढली
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून मुंबईत सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. मुंबईत 87513 रुग्ण संख्या झाली असून आज दिवसभरात 1381 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. मुंबईत दिवसभरात 62 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5061 झाली आहे. मुंबई मृत्यूच्या संख्येने 5 हजाराचा टप्पा ओलाडल्याने मुंबई हादरून गेली आहे.