Coronavirus :राज्यात सलग चौथ्या दिवशी कोरोनाचे 5 हजारांपेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह, 24 तासात 181 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस विक्रमी वाढ होत आहे. मागील चार दिवसांपासून राज्यात 5 हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात गेल्या 24 तासात 5257 नवीन रुग्ण सापडले असून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 69 हजार 883 इतकी झाली आहे. तर राज्यात आज 181 मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये मागील 48 तासात 103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 78 मागील कालावधीत मृत्यू झाले आहेत. राज्यात कोरोनामुळे 7610 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील एकूण 169883 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी 73298 अ‍ॅक्टिव्ह आहेत. या रुग्णांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज मुंबईमध्ये 71 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1226 नवे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान राज्यामध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढत असून आत्तापर्यंत राज्यात 88960 रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने राज्यातील लॉकडाऊन 31 जुलै पर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सध्या जे नियम आहेत त्यात फारसा बदल करण्यात आलेला नाही. कोरोना रुग्णांची सख्या वाढत असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारच्या संवादात याचे संकेत दिले होते. गेल्या चार दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज 5 हजारांची वाढ होत आहे. अनलॉक झाल्याने गर्दी वाढत असून त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे.