Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचे थैमान सुरुच ! गेल्या 24 तासांत 864 रुग्णांचा मृत्यू तर 53,605 नवे बाधित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात यांसारख्या राज्यांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 53,605 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 82,266 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, यामध्ये 864 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत 50,53,336 जणांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता. मात्र, त्यापैकी 43,47,592 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या कोरोनाचे 6,28,213 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत 75,277 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय राज्यात सध्या 37,50,502 रुग्ण होम क्वारंटाईन असून, 28,453 जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

पुण्यात सर्वाधिक रुग्ण

पुण्यात आत्तापर्यंत 9,18,744 प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये 8,01,833 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 10,024 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात सध्या 1,06,829 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईतही वाढतीये कोरोनाबाधितांची संख्या

मुंबई, पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत आत्तापर्यंत 6,73,235 प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये 6,04,858 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 13,713 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 52,874 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.