महाराष्ट्राच्या वाट्याला एकूण १२ मंत्रालयाचा भार; कुणाच्या वाट्याला काय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काल नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ५८ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर कोणत्या नेत्याला काय खाते मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यानुसार दुपारी मोदींनी खातेवाटपाची घोषणा केली. या खातेवाटपात महाराष्ट्राच्या वाट्याला एकूण ७ मंत्रीपदे आली आहेत. यात ३ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रिपदे आहेत. त्यातील ४ मंत्री हे गेल्या सरकारमधील कायम ठेवण्यात आले आहेत. तर तीन नव्या मंत्र्यांना या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.

तर चला पाहूया कोणाला कोणते खाते

कॅबिनेट मंत्री

१)नितीन गडकरी
मोदी सरकारमधील महत्वाचा आणि वजनदार मंत्री म्हणून नितीन गडकरी यांची ओळख आहे. गेल्या मोदी सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग हे पद नितीन गडकरी यांच्याकडे होते. ते त्यांच्याकडे कायम ठेवले आहे. तसेच त्यांना सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे.

२)प्रकाश जावडेकर
२०१४ च्या मोदी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालय हे प्रकाश जावडेकर यांच्याकडे होते. ते त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पर्यावरण मंत्रालयही त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आले आहे. पण त्यांच्याकडे मागील सरकारमध्ये असले मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून घेण्यात आले आहे.

३)पियुष गोयल
महाराष्ट्रातून राज्यसभेतून निवडून गेलेल्या पियुष गोयल यांचे रेल्वे मंत्रालय कायम ठेवले आहे. अरूण जेटली यांच्या अनुपस्थितीत त्यांनी अर्थसंकल्पही सादर केला होता. तसेच त्यांच्याकडे वाणिज्य आणि इंडस्ट्री मंत्रालयाचा भार देण्यात आला आहे. त्यामुळे मोदींना गरज पडेल तिथे हे मंत्री काम करण्यास तयार असल्याने ते मोदींच्या जवळचे आहेत.

४) अरविंद सावंत
शिवसेनेकडून पहिल्यांदा मंत्री झालेले अरविंद सावंत यांच्यावर अवजड उद्योग आणि सार्वजनिक उद्योग मंत्रालयाची भार देण्यात आला आहे. शिवसेनेचे माजी खासदार आणि या खात्याचे मंत्री अनंत गीते यांच्याकडे हे खाते होते. महाराष्ट्र आणि विशेषतः शिवसेना आणि अवज़ड उद्योग मंत्रालय हे जुने गणित आहे.

राज्य मंत्री
१)रावसाहेब दानवे
महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पक्षाला यश मिळवून दिल्यामुळे त्यांच्याकडे ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा राज्य मंत्रीपद देण्यात आले आहे. मागील मंत्रिमंडळात देखील ते एक वर्षासाठी मंत्री होते.

२)रामदास आठवले
गेल्या मंत्रिमंडळात रामदास आठवले यांच्याकडे असलेले खाते कायम ठेवण्यात आले आहे. ते गेल्या मोदी सरकारमध्ये सामाजिक न्याय राज्य मंत्री होते. एकही खासदार नसताना केंद्रात मंत्री असणारे रामदास आठवले एकमेव पक्षप्रमुख आहेत.

३)संजय धोत्रे
गेल्या चार निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांचा पराभव करून खासदार बनवलेल्या संजय धोत्रे यांना पहिल्यांदा मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे तीन खात्यांच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यात मनुष्यबळ विकास राज्यमंत्री, दूरसंचार राज्यमंत्री, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्र्याचा भारही त्यांच्या खांद्यावर देण्यात आला आहे.