दुर्देवी ! पोलिसांची मदत करणार्‍या शिक्षकाला ट्रकनं चिरडलं, जागीच ठार

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन  – सांगली जिल्ह्यात पोलिसांसोबत नाकाबंदीच्या ठिकाणी मदतनीस म्हणून ड्युटीवर असलेल्या एका शिक्षकाला पळून जाणार्‍या ट्रकने उघडविले. त्यात या शिक्षकाचा जागीच मृत्यु झाला. ही घटना जत तालुक्यातील डफळापूर गावाजवळील नाकाबंदीच्या ठिकाणी मध्यरात्री तीनच्या सुमारास घडली. पोलिसांनी ट्रकचालक हणमंत रामचंद्र मुरडे (वय ३७, रा. नाथाचीवाडी, ता़ दौंड, जि़ पुणे) या ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.

नानासाहेब सदाशिव कोरे (वय ३५) असे या शिक्षकाचे नाव आहे. कोरे हे नाकाबंदीसाठी पोलिसांना मदतनीस म्हणून काम करीत होते. पुणे जिल्ह्यातील हा सिमेंटने भरलेला एक ट्रक मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास अथनीकडून नाकांबदीच्या ठिकाणी आला होता. यावेळी कोरे यांनी ट्रकला थांबण्याचा इशारा केला. तेव्हा चालकाने ट्रक न थांबविला तसाच पुढे घेऊन गेला. त्यामुळे संशय आल्याने आपॅरेटर चौगले व कोरे यांनी ट्रकचा डफळापूरपर्यंत पाठलाग केला.

त्यानंतर ट्रकच्या पुढे गाडी लावून ट्रक थांबवायला सांगितले. तरीही ट्रकचालकाने ट्रक न थांबविता कोरे यांना उडविले. त्यात कोरे यांचा जागीच मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, उपविभागीय अधिकारी दिलीप जगदाळे, पोलीस निरीक्षक राजाराम शेळके घटनास्थळी दाखल झाले असून ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.