Sangli News : दुर्दैवी ! क्रिकेट खेळताना मैदानावरच आला हृदयविकाराचा झटका, खेळाडूचा मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगलीच्या (Sangli) आटपाडीमध्ये क्रिकेट स्पर्धेदरम्यान खेळत असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने (Heart Attack) एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (दि.16) दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. अतुल विष्णू पाटील (वय-35) असे मृत्यू झालेल्या खेळाडूचे नाव आहे. अतुल पाटील हे ढवळी गावचे उपसरपंच होते. शुक्रवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ते स्वत: उमेदवार होते.

 

सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने दरवर्षी क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात. यावर्षी त्या आटपाडी येथे सुरु होत्या. तासगाव तालुका संघातून विकेट किपर म्हणून अतुल पाटील खेळत होते. दुपारी तीनच्या सुमारास सामना सुरु असताना त्यांनी एक बॉल अडवला असताना अचानक ते मैदानावरच कोसळले. इतर खेळाडूंनी त्यांच्याकडे धाव घेत त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अतुल पाटील यांचे तासगाव व ढवळी येथे मेडिकल दुकान आहे. ते सांगली जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगीस्ट असोसिएशनचे संचालक होते. ते वसंतराव पाटील विद्यालय मांजर्डेचे माजी प्राचार्य व्ही.एन. पाटील यांचे चिरंजीव होते. अतुल पाटील सलग पाच वर्षे ढवळी गावचे उपसरपंच होते. तसेच अतुल पाटील हे खासदार संजय पाटील समर्थक होते. शुक्रवारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षीक निवडणुकीतही गावातील विरोधकांनाही जवळ करत एकत्र निवडणूक लावली होती. ते स्वत: उमेदवार होते. त्यांच्या अकस्मिक मृत्युमुळे ढवळी गावावर शोककळा पसरली.

रात्री उशीरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी, सहा वर्षाची मुलगी, तीन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.