गर्दी टाळण्यासाठी CM ठाकरे यांचा मोठा निर्णय, मंत्रालयातील कार्यालयीन वेळा 2 शिफ्टमध्ये करणार

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईसह राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कशाप्रकारे बसवता येतील तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येईल, याचे तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत. तसेच मंत्रालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून प्राधान्याने लसीकरण करण्याबाबत नियोजन करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी मंगळवारी (दि. 23) मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यालयीन वेळांची 10 ते 5 ही मानसिकता बदलण्याची गरज आहे, असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे नीती आयोगाच्या बैठकीत बोलले होते, त्या अनुषंगाने महाराष्ट्राने पुढाकार घेऊन नवीन कार्य संस्कृतीची सुरुवात करावी, असे ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आपण या नव्या पद्धतीच्या कामाची सुरुवात करून पाहू ज्यामध्ये कामे पण संपूर्ण क्षमतेने व व्यवस्थित पार पडेल आणि कोरोनाचा धोकाही कमी राहील. अधिकारी महासंघाने यात पुढाकार घेऊन तसेच सर्वाना विश्वासात घेऊन दोन शिफ्ट्समध्ये मंत्रालयातील कार्यालयीन वेळांचे नियोजन कसे करता येईल ते पाहावे. मंत्रालयात दररोज अभ्यागतांची संख्या खूप वाढली असल्याचे महासंघाने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले, यावर काही प्रमाणात प्रतिबंध असणे गरजेचे आहे, यावर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात एक दोन दिवसांत बाहेरून येणाऱ्यांच्या प्रवेश निर्बंधांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.