COVID-19 हॉस्पीटलला CCTV बसवणं होणार बंधनकारक, देखरेखीसाठी प्रत्येक जिल्हयात समिती : ठाकरे सरकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  देशात कोरोनाने सर्वाधिक प्रभावित राज्य महाराष्ट्र आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य सर्वतोपरी उपाययोजना करत आहे. आता कोविड रुग्णालयांमध्ये उपचार व आरोग्य सेवांवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात जिल्हा समित्या तयार केल्या आहेत.

यासंदर्भात एक जीआर देखील लवकरच प्रकाशित केला जाईल, ज्यामध्ये सर्व कोविड रुग्णालयांनी सीसीटीव्ही बसवावे व जेव्हा समिती तेथे भेट देईल तेव्हा रुग्णालय व्यवस्थापनाला त्यांचे फुटेज द्यावे लागतील, असेही आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, प्रत्येक रुग्णालयात एक हेल्प डेस्क तयार करावे लागेल जिथे रूग्णाचे कुटूंब संपर्क साधून रुग्णाला भेटू शकेल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे मुंबई वगळता सर्व जिल्ह्यात जिल्हा समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अधिकृत सूत्रांनुसार, या समितीच्या इतर सदस्यांमध्ये जिल्हा सिव्हिल सर्जन, मनपा आयुक्त, मेडिकल कॉलेजचे डीन, कार्डिओलॉजिस्ट, इंडिया मेडिकल असोसिएशनचे सदस्य (आयएमए) सहभागी असतील.

तसेच मुंबईसाठी मनपा आयुक्तांच्या नेतृत्वात १२ सदस्यीय स्वतंत्र समिती तयार केली जाईल आणि सर्व समित्या प्रधान सचिवांना रिपोर्ट करतील.