शिवसेना आणि राष्ट्रवादी ‘युती’ करून लढू शकतात मुंबई महापालिका निवडणूक, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे ‘संकेत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (रविवार) मुंबई महानगर पालिकेची निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. अजित पवार यांनी सांगितले की, बीएमसी मध्ये शिवसेना एक नंबरचा पक्ष आहे आणि तो राहिला पाहिजे. कारण ते आपल्या आघाडीमध्ये असून राष्ट्रवादी हा दोन नंबरचा पक्ष राहिला पाहिजे अशा सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना बोलताना म्हणाले, तुमच्यामध्ये आणि मित्र पक्ष असलेल्यांमध्ये गैरसमज नसले पाहिजेत. येणाऱ्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूका लढवणार आहे. मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचे सध्या 8 नगरसेवक आहेत. ते वाढून 50 ते 60 झाले पाहिजेत. आजवर या महापालिकेत राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त 14 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे आत्तापासूनच कामाला लागण्याच्या सुचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

विरोधी पक्ष आपली महाविकास आघाडी तोडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र ही ‘दिवार तुटती क्यू नही’ असं विरोधकांना वाटलं पाहिजे. आपल्याला एकमेकांबद्दल विश्वास वाटला पाहिजे. शिवसेना महापालिकेत एक नंबरला राहिला पाहिजे आणि राष्ट्रवादी दोन नंबरचा पक्ष झाला पाहिजे असे अजित पवार यांनी यावेळी म्हटले आहे.