सत्तास्थापनेसाठी ‘एकमत’, ‘मंत्रालय’ वाटपाचा ठरला ‘हा’ फॉर्म्युला !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सरकार स्थापन होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून खातेवाटपावरून चर्चा सुरु आहे. शिवसेनेला मुख्यमंत्री पद आणि 16 मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये 11 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री पदं असू शकतात. तर राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रीपद आणि 15 मंत्रीपद असू शकतात. यामध्ये 11 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्री पदं असू शकतात अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसला 12 मंत्रीपद मिळू शकतात. यामध्ये 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदं, तसेच उपमुख्यमंत्रीपद देखील मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसला विधानसभा सभापतीपद मिळू शकते. वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये तिन्ही पक्षांची बैठक सुरू असून या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित आहेत. राज्यातील सत्तापेचावर या बैठकीत आजच अंतिम फैसला होणार असल्याने राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

भाजपला रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं अशी गळ आघाडीच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांना घातल्याचंही सांगण्यात येत आहे. आजच्या बैठकीमध्ये सत्तास्थापनेचे मुद्दे निश्चित होऊ शकते. तसेच तिन्ही पक्षांचे नेते राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा आज किंवा शनिवारी करतील असे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Visit : Policenama.com