शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या निकटवर्तीयाला ED कडून अटक, मुलाची आज पुन्हा चौकशी

मुंबई : ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने आता टॉप ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सरनाईक यांचे जवळचे मित्र अमित चंडोले यांना अटक केली आहे. बारा तास चौकशी केल्यानंतर झालेली ही अटकेची कारवाई या प्रकरणातील पहिली अटक आहे. ईडीने सरनाईक यांचा मुलगा विहंगला आज चौकशीसाठी पुन्हा हजर राहण्याचे आदेश दिल्याने सरनाईक यांच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसत आहे.

मुंबईतल्या सुरक्षा रक्षकांचे कंत्राट एमएमआरडीएकडे असून त्याचे सब कंत्राट चंडोले याच्या टॉप्स ग्रुपच्या खासगी सुरक्षा कंपनीकडे आहे. या कंत्राटातील 175 कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याचे सूत्रांकडून समजते. ठाण्यातील छाप्यात ईडीला काही कागपत्र सापडली होती त्याद्वारे चंडोले कनेक्शन उघड झाल्यानंत त्यांची बारा तास चौकशी केली गेली. टॉप्स ग्रुप आणि विहंग ग्रुप मधील आर्थिक व्यवहाराबाबत ईडी तपास करत आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर कार्यालयावर तसेच मुलांच्या कार्यालयांवर ईडीने छापेमारी केली होती. आज अटक करण्यात आलेले अमित चंडोळे हे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे जुने निवासस्थान आणि समता नगरमधील मुख्य जनसंपर्क कार्यालय ज्या इमारतीत आहे त्याच इमारतीत छाबियास विहंग सोसायटीत राहतात.

अमित चंडोळे हे आमदार प्रताप सरनाईक यांचे बालपणीचे मित्र असून सरनाईक यांच्यासाठी ते डोंबिवलीहून ठाण्यात व्यवसायासाठी आले. दोघांनी मिळून व्यवसाय सुरू केला. विहंग ग्रूप ऑफ कंपनीला मोठा फायदा होत गेला. अमित चंडोळे सध्या या कंपनीच्या डायरेक्टरपदावर आहेत. याशिवाय वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये देखील त्यांची भागीदारी आहे. टॉप सिक्युरीटी आणि विहंग ग्रुप ऑफ कंपनी यांच्यातील सेतू अमित चंडोळे असल्याचे समजते.

अमित चंडोळे यांच्या अटकेनंतर प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही ईडीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. ईडी आता पुढील कोणते पाऊल उचलते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

You might also like