10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांनो, अभ्यासाला लागा ! या तारखांना सुरू होऊ शकते परीक्षा

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल-मे 2021 मध्ये घेण्यात येणा-या 10 वी आणि 12 वी च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार 12 वीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान, तर10 वीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. तसेच सोशल मीडियावरून प्रसिद्ध आणि व्हायरल होणारे वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये, विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतुने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील परीक्षेचा ताण कमी व्हावा, या दृष्टीने एप्रिल-मे 2021 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घेऊन विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. भोसले यांनी केले आहे.