MIM कडून राष्ट्रवादीला धक्का, ‘या’ नेत्याला दिली विधानसभेची उमेदवारी

मालेगाव : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. पुढील महिन्यात हि निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार आणि नेते मोठ्या प्रमाणात पक्षांतर करताना दिसून येत आहेत. तसेच अनेक विधानसभा मतदारसंघात वातावरण तापलेले दिसून येत आहे. त्याचबरोबर एका बाजूला युती आणि आघाडीचे जागावाटप सुरु असताना दुसऱ्या बाजूला एमआयएमने मात्र विधानसभा निवडणुकीत आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

वंचित बहुजन आघाडीबरोबर काडीमोड झाल्यानंतर एमआयएमने आपल्या उमेदवारांच्या मुलाखती सुरु केल्या असून प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी या मुलाखती घेण्याचे काम सुरु केले आहे. एमआयएमने आपल्या तीन उमेदवारांची घोषणा केली असून यामध्ये मालेगाव मध्य, वडगाव शेरी अंडी नांदेड उत्तर या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली असून मालेगावमधील उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेला आहे.

मौलाना मुफ्ती इस्माईल यांना उमेदवारी दिली गेलेली असून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देखील आघाडी घेतली आहे. पक्षाने वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून डॅनियल लांडगे, मालेगाव  विधानसभा मतदारसंघातून मौलाना मुफ्ती इस्माईल यांना तर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून मोहम्मद फेरोज खान लाला यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, त्याआधी वंचित बहुजन आघाडीबरोबर युती तुटल्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर एमआयएमने आपली तयारी सुरु केली असून वंचित बहुजन आघाडीने देखील आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उमेदवार देतात कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.