Coronavirus : राज्यातील ‘कोरोना’ बाधित रुग्णांच्या संख्येने ओलांडला 20 लाखांचा टप्पा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मागील नऊ महिन्यापासून कोरोनाचे संसर्गाचे संकट झेलत असलेल्या महाराष्ट्रात अद्यापही काही प्रमाणात कोरोनाचा धोका कायम असल्याचे चित्र आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने आज 20 लाखांचा टप्पा पार केला आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

राज्याने आज (गुरुवार) 20 लाखांचा टप्पा पार केला आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 लाख 878 इतकी झाला आहे. आजपर्यंत राज्यात घेण्यात आलेल्या 1 कोटी 40 लाख 19 हजार 188 चाचण्यांमधून 14.27 टक्के अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. आज एकाच दिवशी 2 हजार 886 नवीन रुग्णांची भर पडली आहे. राज्यात कोरोना बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे राज्याला हा दिलासा कायम आहे.

आज दिवसभरात 3 हजार 980 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत 19 लाख 03 हजार 408 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.13 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात 2 लाख 12 हजार 023 लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1 हजार 936 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. गेल्या 24 तासांत 54 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा आता 50 हजार 634 इतका झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.53 टक्के इतका आहे. तर राज्यात 45 हजार 622 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.