Coronavirus : राज्यात दिवसभरात 3080 जण ‘कोरोना’मुक्त, 30 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना मृत्यू आणि नवीन रुग्णांचे प्रमाण यात आज (सोमवार) मोठी घट झाल्याचे पहायला मिळाले. आज 30 कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दिवसभरात 1 हजार 842 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 3 हजार 080 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजची आकडेवारी राज्याला खूप मोठा दिलासा देणारी आहे.

राज्यात कोरोना रिकव्हरी रेट वाढला असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 43 हजारांच्या खाली आला आहे. राज्यात कोरोनाची स्थिती वेगाने नियंत्रणात येत असून रविवारी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णाची संख्या काहींसी कमी होती. मात्र, आज ही संख्या पुन्हा एकदा वाढली आहे. नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे. दुसरीकडे मृतांचा आकडा देखील आज कमी झाला आहे.

राज्यात आज 30 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 50 हजार 815 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात कोरोना मृत्यूदर 2.53 टक्के इतका असून हा दर कमी करण्याचे आव्हान मात्र आजही कायम आहे. राज्यात आजपर्यत 19 लाख 15 हजार 344 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.25 टक्के एवढे आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 42 लाख 57 हजार 998 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 20 लाख 10 हजार 948 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 14.10 टक्के एवढे आहे. सध्या राज्यात 2 लाख 7 हजार 971 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर 2 हजार 360 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.