Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6397 नवे रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन – राज्यात कोरोनानं पुन्हा एकदा हातपाय पसरवण्यास सुरुवात केल्यानं आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मागिल तीन दिवस राज्यात आठ हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले होते. राज्यात गेल्या 24 तासात 6 हजार 397 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

आज राज्यात 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 52 हजार 184 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सध्याचा मृत्यू दर 2.41 टक्के इतका आहे. तर आज दिवसभरात 5 हजार 754 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत 20 लाख 30 हजार 458 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.94 टक्के इतके झाले आहे.

सध्या राज्यात 77 हजार 618 ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 63 लाख 46 हजार 358 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 21 लाख 61 हजार 467 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 13.22 टक्के इतके आहे. सध्या 3 लाख 43 हजार 947 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर 3 हजार 482 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.