Corona in Maharashtra : टेन्शन कायम ! सलग दुसऱ्या दिवशी राज्यात ‘कोरोना’चे 10 हजाराहून अधिक नवीन रुग्ण, 47 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनानं पुन्हा एकदा हातपाय पसरवण्यास सुरुवात केल्यानं आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. डिसेंबरपासून राज्यातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत होती. मात्र, आता कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. काल दहा हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर आज (शनिवार) पुन्हा दहा हजारांच्यावर रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 10 हजार 187 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

आज राज्यात 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 52 हजार 440 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सध्याचा मृत्यू दर 2.37 टक्के इतका आहे. तर आज दिवसभरात 6 हजार 080 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत 20 लाख 62 हजार 031 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.36 टक्के इतके झाले आहे. राज्यात रुग्ण वाढीबरोबर मृतांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे.

सध्या राज्यात 92 हजार 897 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 67 लाख 76 हजार 051 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 22 लाख 08 हजार 586 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 13.17 टक्के इतके आहे. सध्या 4 लाख 28 हजार 676 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर 4 हजार 514 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.