Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9927 नवे रुग्ण, 56 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे.
आज 9 हजार 927 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 22 लाख 38 हजार 398 एवढी झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 13.15 टक्के इतके आहे. राज्यात वाढत्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येमुळे प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. प्रशासनाकडून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांना मास्कचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

राज्यात गेल्या 24 तासात 56 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 52 हजार 322 इतकी झाली आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 2.35 टक्के इतके आहे. याच दरम्यान राज्यात 12 हजार 182 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.34 टक्के असून आतापर्यंत 20 लाख 89 हजार 294 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या राज्यामध्ये 95 हजार 322 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आजपर्यंत राज्यामध्ये 1 कोटी 70 लाख 22 हजार 315 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत.
त्यापैकी 22 लाख 38 हजार 3398 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर उर्वरीत जणांचा निगेटिव्ह आला आहे. राज्यात 4 लाख 57 हजार 962 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 3 हजार 827 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.