Corona in Maharashtra : राज्याच धोका कायम ! गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 36902 नवीन रुग्ण, 112 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. एकीकडे लसीकरण सुरु असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. गेल्या 24 तासात आढळून आलेली रुग्ण संख्या ही चालू वर्षातील सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. गेल्या 24 तासात तब्बल 36 हजार 902 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे.

राज्यात रुग्ण वाढत असताना राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. सध्या राज्यात 2 लाख 82 हजार 451 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात राज्यात 17 हजार 019 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 23 लाख 056 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटले आहे. सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.2 टक्के इतके आहे.

राज्यात गेल्या 24 तासात 112 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या 53 हजार 907 एवढी झाली आहे. राज्यात मृत्यू होण्याचे प्रमाण 2.04 टक्के इतके आहे. आजपर्यंत घेण्यात आलेल्या 1 कोटी 90 लाख 35 हजार 439 प्रयोगशाळा तपासण्यामध्ये 26 लाख 37 हजार 735 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 13.86 टक्के आहे. सध्या 14 लाख 29 हजार 998 रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 14 हजार 578 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

पुण्यात 52 हजारांच्यावर अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील वेगाने वाढत आहे. राज्यात पुण्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पुण्यात 52 हजार 340 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत 36 हजार 404, ठाणे 27 हजार 474, नाशिक 20 हजार 568, औरंगाबाद 19 हजार 063, नागपूर 38 हजार 348, नांदेड 12 हजार 943 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.