Corona in Maharashtra : राज्यात ‘कोरोना’चा उद्रेक ! गेल्या 24 तासात 40 हजाराहून अधिक नवीन रुग्ण, 108 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून संपूर्ण देशभरातील राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्राच्या आणि राज्याच्या चिंतेत भर पडत आहे. राज्यात आज नवीन कोरोना बाधित रुग्णसंख्येचा उद्रेक झालेला पहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात 30 हजारांच्यावर रुग्ण आढळून येत आहेत. मात्र आजची रुग्णसंख्या सर्वांना धडकी भरवणारी आहे. गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 40 हजार 414 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पहायला मिळत आहे.

राज्यात मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. याशिवाय मृत्यूंच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे राज्य शासनासमोर कोरोना संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आज दिवसभरात राज्यात 108 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 54 हजार 901 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2 टक्के इतका आहे.

राज्यात आजपर्यंत 3 लाख 25 हजार 901 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात असून पुण्यात 62 हजार 022 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज 17 हजार 874 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत 23 लाख 32 हजार 453 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.95 टक्के इतके झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 93 लाख 58 हजार 341 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 27 लाख 13 हजार 875 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 14.02 टक्के आहे. सध्या राज्यात 15 लाख 56 हजार 476 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 15 हजार 852 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.