Coronavirus : राज्यात दिवसभरात ‘कोरोना’चे 3081 नवीन रुग्ण, 50 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच आहे. रविवारी (दि.17) दिवसभरात 3 हजार 081 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनातून बरे झालेल्या एकूण 2 हजार 342 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 18 लाख 86 हजार 469 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या आकडेवारी नुसार राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.76 टक्के इतके झाले आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 19 लाख 90 हजार 759 वर पोहचली आहे. सध्या राज्यात 52 हजार 653 अॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यात आज 50 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यात आजपर्यंत 50 हजार 738 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर 2.54 इतका झाला आहे. राज्यात सर्वाधिक मृत्यू मुंबईमध्ये झाले आहेत.

लसीकरणासाठी नाव नोंदणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीला तीन वेळा फोनवरुन आणि तीन वेळा एसएमएस पाठवून लसीकरणाची आठवण करुन दिली जाणार आहे. मात्र, त्यानंतरही एखादी व्यक्ती लसीकरणासाठी आली नाही तर ती व्यक्ती लस घेण्यास उत्सुक नाही, असे समजून त्याचे नाव लसीकरणातून बाद करण्यात येणार असल्याची माहिती, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.