Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चा हाहा:कार ! राज्यात दिवसभरात 57 हजारांपेक्षा अधिक नवीन रुग्ण, 222 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना रुग्णसंख्येने आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक वेगाने वाढत आहे. रुग्णसंख्येत दररोज मोठी वाढ होत आहे. तसेच रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहेत. आज दिवसभरात राज्यात तब्बल 57 हजार 074 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 222 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आजच्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे.

राज्यात आज 222 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.86 टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत 55 हजार 878 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज रोजी राज्यात 4 लाख 30 हजार 503 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रात पुण्यामध्ये सर्वाधिक 81 हजार 317 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात रुग्ण संख्या वाढत असताना कोरोनामुक्त होणाऱ्या संख्येत वाढ होत आहे. आज 27 हजार 508 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत 25 लाख 22 हजार 823 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 83.8 टक्के एवढा झाला. आहे. मागील काही दिवसांपासून रिकव्हरी रेट वेगाने घटत आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 05 लाख 40 हजार 111 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 30 लाख 10 हजार 597 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 14.66 टक्के आहे. सध्या राज्यात 22 लाख 05 हजार 899 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 19 हजार 711 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील प्रमुख शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात पुण्यात सर्वाधिक 81317, मुंबई 66803, ठाणे 53230, नाशिक 31737, औरंगाबाद 16054, नांदेड 11079, नागपूर 53638, जळगाव 8421, अहमदनगर 14293 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.