Coronavirus : राज्यात ‘कोरोना’ रुग्णसंख्येत लक्षणीय घट, रिकव्हरी रेट 94.86 %

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना रुग्णवाढीचे सत्र गेल्या काही दिवसांपासून वाढत असताना आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली होती. मात्र, आज (सोमवार) कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या सख्येत वाढ झाली आहे. आज आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार दिवसभरात फक्त 1 हजार 924 रुग्ण सापडले आहेत. एवढ्या कमी संख्येने रुग्ण आढळून आल्याने काही अंशी दिलासा मिळाला आहे. राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 19 लाख 92 हजार 683 इतकी झाली आहे.

आज राज्यात दिवसभरात 3 हजार 854 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत राज्यात 18 लाख 90 हजार 323 कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.86 टक्के इतके झाले आहे. तर राज्यात सध्या 50 हजार 680 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

राज्यात आज दिवसभरात 35 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 50 हजार 473 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.53 टक्के एवढे आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 38 लाख 45 हजार 897 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 19 लाख 92 हजार 683 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 14.39 टक्के आहे. सध्या राज्यात 2 लाख 21 हजार 280 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2 हजार 094 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.