Coronavirus : राज्यात ‘कोरोना’ विस्फोट ! गेल्या 24 तासात 68 हजार पेक्षा अधिक नवे रुग्ण, 500 हून अधिक जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच सेवा बंद करण्यात आल्या आहेत. तरीही राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कमी होत नाही. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यांची संख्या वाढत आहे. आज राज्यात तब्बल 500 पेक्षा अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे. राज्यात आज 68 हजार 631 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 38 लाख 39 हजार 338 एवढी झाली आहे.

आज राज्यात 45 हजार 654 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 31 लाख 6 हजार 828 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.92 टक्के आहे. रुग्ण वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 503 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 60 हजार 473 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.58 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 6 लाख 70 हजार 388 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 1 लाख 22 हजार 486 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 38 लाख 54 हजार 185 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 38 लाख 39 हजार 338 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 16.1 टक्के आहे. सध्या राज्यात 36 लाख 75 हजार 518 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 26 हजार 529 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील प्रमुख शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात पुण्यात सर्वाधिक 1,22,486, मुंबई 86688, ठाणे 86732, नाशिक 42563, औरंगाबाद 14344, नांदेड 12576, नागपूर 73485, जळगाव 12795, अहमदनगर 18163 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.