Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चा कहर सुरुच ! गेल्या 24 तासात 58 हजार 924 नवीन रुग्ण, 351 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच सेवा बंद करण्यात आल्या आहेत. तरीही राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कमी होत नाही. राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे. अनेक शहरांमध्ये बेड उपलब्ध होत नाहीत. त्यातच ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत असल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. राज्यात आज 58 हजार 924 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 351 जणांचा मृत्यू झाला आहे.

आज राज्यात 52 हजार 412 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 31 लाख 59 हजार 240 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.40 टक्के आहे. रुग्ण वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 351 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 60 हजार 824 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.56 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 6 लाख 76 हजार 520 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 1 लाख 25 हजार 096 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 40 लाख 75 हजार 811 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 38 लाख 98 हजार 262 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 16.19 टक्के आहे. सध्या राज्यात 37 लाख 43 हजार 968 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 27 हजार 081 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील प्रमुख शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात पुण्यात सर्वाधिक 1,25,096, मुंबई 85321, ठाणे 80976, नाशिक 40335, अहमदनगर 19983, सातारा 13398, सोलापूर 12504, रायगड 12233,जळगाव 13122, औरंगाबाद 14393, नांदेड 13497, नागपूर 76961, अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.