Coronavirus In Maharashtra : गेल्या 24 तासात 66 हजार 836 नवीन कोरोना रुग्ण, 773 रुग्णांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यातील आरोग्य यंत्रणेची झोप उडवली आहे. सध्या सातत्याने दररोज 60 हजारांहून नवीन रुग्णांची भर पडत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. अनेक रुग्णालयांचे बेड्स फुल्ल झाले आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशी भीषण स्थिती असताना आज (शुक्रवार) राज्यात पुन्हा 66 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले असून मृत्यूची संख्या वाढल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 66 हजार 836 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 773 मृत्यूंची नोंद झाली आहे.राज्यात संचारबंदी व कठोर निर्बंध लावण्यात आले असताना रुग्णवाढ थांबू शकलेली नाही.

आज दिवसभरात 74 हजार 045 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 34 लाख 4 हजार 792 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 81.81 टक्के एवढा आहे. आज राज्यात 773 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आजपर्यंत 63 हजार 252 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील कोरोना मृत्यूदर 1.52 टक्के एवढा आहे.

सध्या राज्यामध्ये 6 लाख 91 हजार 266 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 1 लाख 16 हजार 602 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 51 लाख 73 हजार 596 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 41 लाख 61 हजार 676 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 16.53 टक्के आहे. सध्या राज्यात 41 लाख 88 हजार 266 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 29 हजार 378 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.