Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चे 57 हजार 640 नवीन रुग्ण; 920 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात झाला आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम देखील सुरु आहे. मात्र तरी देखील कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. मागील काही दिवसांत राज्यातील रुग्णांच्या संख्यत घट झाली होती. मात्र दोन दिवसांपासून राज्यातील रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. आज दिवसभरात राज्यात 57 हजार 640 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 920 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज राज्यात 57 हजार 006 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 41 लाख 64 हजार 098 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.32 टक्के आहे. रुग्ण वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 920 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 72 हजार 662 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.49 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 6 लाख 41 हजार 569 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 1 लाख 14 हजार 254 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 83 लाख 84 हजार 582 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 48 लाख 80 हजार 542 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 17.19 टक्के आहे. सध्या राज्यात 38 लाख 52 हजार 501 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 32 हजार 174 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.