Coronavirus : दिलासादायक ! राज्यात ‘कोरोना’चे 41 हजार नवीन रुग्ण, 72 हजार रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. मागच्या काही आठवड्यांशी तुलना केली तर राज्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मागील काही दिवसांमध्ये नवीन रुग्णांची संख्या 62 हजारांच्या पुढे गेली होती. मात्र, आता रुग्ण कमी होत असल्याने महाराष्ट्र कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे पहायला मिळत आहे. आज (मंगळवार) दिवसभरात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

आज दिवसभरात राज्यात 40 हजार 956 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 71 हजार 966 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 45 लाख 41 हजार 391 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.67 टक्के आहे. रुग्ण बरे होत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 793 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 77 हजार 191 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.49 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 5 लाख 58 हजार 996 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 95 हजार 731अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 98 लाख 48 हजार 791 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 51 लाख 79 हजार 929 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 17.35 टक्के आहे. सध्या राज्यात 35 लाख 91 हजार 783 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 29 हजार 955 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.