Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 47,371 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 91.43%

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्येत होणारी वाढ रोखण्यात यश येत आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने खाली येत आहे. नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज रुग्णांची संख्या 30 हजारांच्या आत आल्याने दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कोरोना मृत्यूंचे प्रमाण आजही चिंतेची बाब आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 29 हजार 911 नव्या कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. काल निदान झालेल्या रुग्णांची संख्या 34 हजार 031 इतकी होती. कालच्या तुलनेत आज नव्या रुग्णांची संख्या 4120 ने घटली आहे.

गेल्या 24 तासात राज्यात 47 हजार 191 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत 50 लाख 26 हजार 308 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.43 टक्के आहे. रुग्ण बरे होत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 738 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 85 हजार 355 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.55 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 3 लाख 83 हजार 253 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 64 हजार 084 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 21 लाख 54 हजार 275 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54 लाख 97 हजार 448 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 17.09 टक्के आहे. सध्या राज्यात 29 लाख 35 हजार 409 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 21 हजार 648 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.