काय सांगता ! होय, लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीमूळे राज्याच्या तिजोरीत 750 कोटींची भर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊनच्या काळात मे महिन्यात मद्यविक्री करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. सरकारने परवानगी दिल्यापासून आत्तापर्यंत राज्याच्या तिजोरीत अबकारी कराच्या रुपाने 450 कोटी रुपये तर विक्री कराच्या रुपाने 300 कोटी अशी 750 कोटी रुपयांची भर पडली आहे. राज्याच्या उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने एका मराठी पेपरशी बोलताना सांगितले.

मुंबईसह एमएमआर, पुणे व पीएमआर या दोन महत्त्वाच्या शहरी पट्ट्यांमध्ये 22-23 मे रोजी मद्यविक्रीस परवानगी मिळाली. तर उर्वरीत राज्यात त्यापूर्वीच 4-5 मे रोजी मद्याची दुकाने खुली झाली. राज्याच्या एकंदर महसुलात मद्यावर आकारल्या जाणाऱ्या उत्पादन शुल्क व विक्री कराच्या रुपाने 25 हजार 500 कोटी रुपयांची भर पडत असते. राज्याच्या एकूण महसुलात सगळ्यात मोठा वाटा हा जीएसटीचा (1 लाख कोटी), त्या खालोखाल डिझेल, पेट्रोलवर आकारण्यात येणारा व्हॅट म्हणजेच मूल्यवर्धित कर (30 हजार कोटी), त्यानंतर स्टॅम्प ड्युटी (27500 कोटी), वीज बिल (10 हजार कोटी), तर ट्रान्सपोर्ट म्हणजे गाड्यांच्या नोंदणीतून येणाऱ्या कराच्या रुपाने 7500 कोटी रुपये मिळतात.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाला असला तरी अनेक जिल्ह्यांनी त्याच्या दोन-चार दिवस आधिपासूनच आपापल्या विभागातील मद्य दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या कालावधीत राज्याचा सुमारे 4 हजार कोटी रुपयांचा महसूल बुडाला होता. एकूणच अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने व सारे व्यवहार थांबल्याने तिजोरीत खडखडाट व्हायला लागल्यामुळे अनेक राज्यांनी केंद्राकडे मद्याची दुकाने उघडण्याची परवानगी मागितली होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मद्याची किरकोळ विक्री बंद असल्याने व राज्यातील अनेक कारखाने बंद असल्याने उत्पादन शुल्क व मद्यावरील कर हे दोन्ही मिळत नव्हते मात्र, आता गेल्या 20-25 दिवसांमध्ये उत्पादन शुल्क व विक्री कराच्या रुपाने राज्याच्या तिजोरीत सुमारे 750 कोटी रुपये जमा झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्याच्या काळात राज्याच्या तिजोरीत कररुपाने आलेला हा सर्वात मोठा वाटा असल्याचीही माहिती या अधिकाऱ्याने दिली.

मद्यविक्री – दरवर्षी सुमारे 86 कोटी लिटर
दररोज सुमारे 24 लाख लिटर
कर – दररोज 45-50 कोटी रुपये उत्पादन शुल्क
दररोज 25-30 कोटी रुपये विक्री कर
विक्रीतील वाटा – 70 टक्के मद्याची किरकोळ विक्री
30 टक्के मद्याची परमिट रुममध्ये विक्री